तृणमूल काँग्रेस राजकारणासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते

amit shah challenge mamata banerjee

सामना ऑनलाईन । कोलकाता

रोड शोदरम्यान आधीच त्या ठिकाणी लावण्यात आलेले आपले पोस्टर फाडण्यात आले. अडीच तास शांततेत रोड शो पार पडल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व त्यांच्या समर्थकांनी जाणूनबुजून हिंसाचार घडवून आणला. या हिंसाचारावरून तृणमूल काँग्रेस राजकारणासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते हे दिसून येत असल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

कोलकात्यात मंगळवारी तृणमूल आणि भाजप कार्याकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी अमित शहा यांनी कोलकात्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जाणूनबुजून हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप केला. रोड शोदरम्यान आपल्या ताफ्यावर तीन वेळा हल्ला झाला. तिसऱ्या हल्ल्यात तोडफोड, जाळपोळ आणि बाटल्यांमध्ये केरोसीन भरून फेकण्यात आले. या हिंसाचारातून अत्यंत मुष्किलीने आपण बाहेर पडलो. त्यावेळी सीआरपीएफ नसती तर माझे जिवंत बाहेर पडणे शक्य नव्हते, असेही ते म्हणाले.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेले आरोपही शहा यांनी यावेळी फेटाळले. विद्यापीठाचे गेट बंद होते तर भाजपचे कार्यकर्ते रोड शोमध्ये मग पुतळा कसे तोडू शकतात, असा सवालही शहा यांनी यावेळी केला. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या हिंसाचाराची निंदा केली असून अशाप्रकारचा गुंडाराज भाजपने अजिबात सहन करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

आम्ही बहुमताचा टप्पा कधीच गाठलाय
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच आम्ही बहुमताचा टप्पा गाठल्याचा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. तसेच विरोधी पक्षांनी बोलावलेल्या बैठकीवरून त्यांच्यावर निशाणा साधला. विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी ही बैठक बोलावल्याचा टोलाही त्यांनी लगावला.