
‘तुम्ही काय काम करता, रात्री फोन केला तर उचलला नाही, दोन दिवस फाईल पाठवून झाले, तुम्ही झोपा काढता का?’ अशा भाषेत दमदाटी करत भाजपाचे नगरसेवक धनराज घोगरे महापालिकेच्या लसीकरण अधिकारी डॉ.वैशाली जाधव यांच्या अंगावर धावून गेले. अखेर डॉ.जाधव यांना अन्य सहकारी डॉक्टरांनी व घोगरे यांना इतर सदस्यांनी मध्यस्थी करून अडविले.
‘लसीकरण केंद्र सुरू करा, आमचा फोन का उचलला नाही, सीसीसीमध्ये इंजेक्शन द्या, बेड लगेच मिळाला पाहिजे, अशा एक ना अनेक आदेशांमुळे आधीच त्रस्त झालेल्या आरोग्य अधिकाऱ्यांचा बुधवारी उद्रेक झाला. ’आता बास. तुम्ही कामे करता तर आम्ही झोपा काढत नाही. आम्हीही डॉक्टर आहोत, आम्हालाही लोकांच्या जिवाची काळजी आहे. तुमची अरेरावी ऐकून घेण्यासाठी आम्ही तुमचे नोकर नाहीत’, अशा संतप्त भावना व्यक्त करीत या आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘आम्ही काम सोडून जातो, तुम्हीच कामे करा’ असा पवित्रा घेत काम बंद करण्याचा निर्णय काहीकाळ घेतला.
नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी भाजपाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी आरोग्यप्रमुख डॉ.आशिष भारती यांच्या दालनात मागणी लावून धरली. यावेळी डॉ.भारती यांनी लसीकरण अधिकारी डॉ.वैशाली जाधव यांना बोलाविले, त्यावेळी हा प्रकार घडला.
दरम्यान, या घटनेमुळे सर्वच सहायक आरोग्य अधिकारी संतप्त झाले. आता किती वेळा नगरसेवकांची अरेरावी, धमक्या ऐकून घ्यायच्या. म्हणून अखेर काम बंद करण्याचा निर्णय घेत महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे धाव घेतली आहे.































































