“जिथं कमावता, तिथली भाषा यायलाच हवी; हिंदी शिका, नाहीतर…” आफ्रिकन फुटबॉल कोचला भाजप नगरसेविकेची धमकी

राजधानी दिल्लीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रेणू चौधरी आफ्रिकन नागरिकाला हिंदी शिकण्याची धमकी देताना दिसत आहेत. एक महिन्यात हिंदी शिका नाही तर दिल्ली सोडून जा, अशी धमकी पार्कमध्ये मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या आफ्रिकन कोचला भाजप नगरसेविका देतात.

व्हायरल व्हिडीओमध्ये पूर्व दिल्लीतील प्रतापगंजमधील वॉर्ड क्रमांक 197 च्या भाजप नगरसेविका रेणू चौधरी पार्कातील काही लोकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. यावेळी त्या पार्कात मुलांना फुटबॉल शिकवणार्‍या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीला हिंदी शिकवण्याचा सल्ला देतात. हिंदुस्थानात राहूनही तुला अजून हिंदी येत नाही का? असा सवाल करत रेणू चौधरी त्याला एका महिन्यात हिंदी शिका नाहीतर पार्क सोडा, अशी धमकी देतात.

जिथे राहता तिथली भाषा यायलाच हवी, असा पवित्रा नगरसेविका घेतात. जे लोक हिंदुस्थानात राहून पैसे कमावतात, त्यांना हिंदी यायलाय हवी. जर तू हिंदी शिकला नाही तर पार्क सोडून जा, असेही रेणू चौधरी यांनी आफ्रिकन नागरिकाला धमकावले.

पार्काच्या नियमांवरूनही रेणू चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पार्क रात्री आठ वाजेपर्यंत बंद झाले पाहिजे आणि तिथे कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती आढळल्यास त्याला तुम्ही जबाबदार असाल असे त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.

दरम्यान, रेणू चौधरी यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र रेणू चौधरी यांनी याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.