भाजपची धडधड वाढली, नाराज खडसे पवारांना भेटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. दोनच दिवसांपूर्वी वारंवार अन्याय, अत्याचार होत राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देणाऱया खडसे यांनी सोमवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली. ते मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.

भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुक्ताईनगर या भाजपच्या पारंपरीक मतदारसंघातून खडसे यांना प्रथम उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. पण पक्षविरोधी कारवायांमुळे तिला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातच भाजपच्या कोअर कमिटीतून काढून टाकण्यात आल्यामुळे राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी सोमवारी अचानक दिल्लीत दाखल होत भाजपच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची दिल्लीतील भाजप नेत्यांशी भेट होऊ शकली नाही. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वतुर्ळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी पवारांसोबतची आपली भेट ही सरकारी कारणास्तव होती. जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेजचा प्रश्न जल आयोगाकडे प्रलंबित आहे. या योजनेला राज्य सरकारकडूनही मदत मिळावी या संदर्भात या भेटीत चर्चा केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारांनीच रोहिणी खडसे यांच्या पराभवाची चौकशी केली. त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत राजकारणाचा फटका बसल्याचे सांगितले. या प्रकल्पासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मला जर कुठल्या पक्षात जायचे असेल तर अंधारात जाणार नाही. पत्रकार परिषद घेऊन जाईन. माझा पक्षात वारंवार अपमान होत आहे. त्यामुळे मी वेगळी भूमिका घेणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार की नाही लवकरच कळेल.
– एकनाथ खडसे, भाजप ज्येष्ठ नेते