संजय राऊत यांना भाजप घाबरते! आमदार सुनील राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप संजय राऊत यांना घाबरते. म्हणूनच त्यांना ईडीच्या जाळय़ात अडकविण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. आमच्या कुटुंबावर कोणी कितीही दबाव आणला, अन्याय केला तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे, तर काल त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही ईडीने चौकशी केली. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आमदार सुनील राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. संजय राऊत हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत. त्यामुळे संजय राऊत भ्रष्टाचार करूच शकत नाहीत. गेल्या दोन-अडीच वर्षांत ज्या प्रकारे ते भाजपविरोधात लढत आहेत, ते पाहूनच भाजपने त्यांना ईडीच्या जाळय़ात अडकवले आहे, असे आमदार राऊत म्हणाले.

मोहित कंबोज यांची चौकशी करा

संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या केसमध्ये काहीही दम नाही. खरेतर मुंबईत कोणी किती संपत्ती गोळा केली आहे, हे सर्वांना माहीत आहे. मात्र आमच्या प्रत्येक संपत्तीची लिंक पत्रा चाळीशी लावण्यात येत आहे. पत्रा चाळीतील मोहित कंबोज आणि इतर कंत्राटदारांचीही ईडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही आमदार राऊत यांनी यावेळी केली.