झारखंडमध्येही भाजपची कालाकांडी; काँग्रेस आमदारांना 10 कोटींची ऑफर, अनुप सिंह यांचा खळबळजनक दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिगरभाजपशासित राज्यांत सत्तेचे ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्यासाठी भाजपची कट-कारस्थाने सुरूच राहिली आहेत. झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या वतीने काँग्रेस आमदारांना 10 कोटी आणि मंत्रीपदाची ऑफर दिली गेली, असा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार अनुप सिंह यांनी रविवारी केला. भाजप पक्षश्रेष्ठींच्या वतीने आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या सांगण्यावरून ही ऑफर दिली गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये शनिवारी रात्री झारखंडमधील इरफान अन्सारी, राजेश कच्छप आणि नमन विक्सल काsंगडी या काँग्रेसच्या तीन आमदारांच्या कारमधून 48 लाखांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. यावेळी तिन्ही आमदार त्या कारमध्ये होते. त्यांच्यावरील कारवाईनंतर अनुप सिंह यांनी रविवारी मोठा दावा करून भाजपच्या षड्यंत्राची पोलखोल केली. सिंह हे बर्मो येथील काँग्रेसचे आमदार आहेत. इरफान अन्सारी यांनी सोरेन सरकार पाडण्याच्या कारस्थानात सहभागी होण्यासाठी मला 10 कोटी रुपये आणि नव्या सरकारमध्ये मंत्रीपदाची ऑफर दिली. अन्सारी, कच्छप आणि काsंगाडी यांनी मला कोलकात्यात येण्यासाठी दबाव टाकला होता. तेथून ते मला गुवाहाटीला घेऊन जाणार होते. तेथे आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा यांच्याशी भेट घडवून दिली जाणार होती, असे अनुप सिंह यांनी रविवारी सांगितले. त्यांनी यासंदर्भात ऑफर देणाऱया तिन्ही आमदारांविरुद्ध रांचीच्या अरगोडा ठाण्यात तक्रार केली आहे. झारखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनीही भाजपचा झारखंड सरकार अस्थिर करण्याचा डाव असल्याचा दावा केला आहे.

रोख रकमेचे ‘आसाम कनेक्शन’

निलंबित काँग्रेस आमदारांच्या कारमध्ये सापडलेल्या रोख रकमेचे ‘आसाम कनेक्शन’ असल्याचा संशय वर्तवला जात आहे. काही दिवसांपूर्वी झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षाची आसाममधील एका वजनदार नेत्याशी चर्चा झाली होती. ही बैठक राजधानी दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाली होती. या घडामोडींमुळे रोख रकमेचे आसाम कनेक्शन असल्याची शक्यता बळावली आहे.

भाजपच्या वळचणीला गेलेले आमदार काँग्रेसमधून निलंबित

भाजपच्या वळचणीला गेलेल्या काँग्रेसच्या तीन आमदारांकडे 48 लाखांची रोख रक्कम सापडल्यानंतर झारखंड काँग्रेस विधिमंडळाचे नेते आलमगीर आलम यांनी तिन्ही आमदारांना निलंबित केले आहे. या आमदारांसह पाच जणांना हावडा पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांच्याकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पैसे आले कोठून, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी रोख रकमेतील नोटा मोजण्यासाठी मशीन मागवले होते.