
भाजपच्या पदाधिकार्याने लिहिलेल्या पुस्तकाचा वाद शमला नसतानाच भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलेली तुलना हा शिवरायांचा सन्मानच असल्याचे वक्तव्य करून त्यांनी हा वाद पुन्हा उकरून काढला.
कोल्हापूर जिल्हा भाजप पदाधिकार्यांच्या निवडी वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा पुढे करीत विरोधकांवर निशाणा साधला. मात्र याच्याही पुढे जाऊन सुरेश हाळवणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज अशी तुलना करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे मी समर्थन करतो, अशी तुलना करणे गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे, अशा शब्दांत अकलेचे तारे तोडले.
गेल्या दोन दिवसांपासून जिह्यातील भाजप पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात येत आहेत. आर्थिक फसवणुकीच्या एका प्रकरणामुळे तत्कालीन जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांना पदावरून डच्चू देण्यात आला होता. त्या वेळी त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक राहुल चिकोडे यांची वर्णी लावण्यात आली होती. विधानसभेचे पराभूत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


























































