एकनाथ खडसे भाजप सोडणार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

eknath-khadse

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे अखेर भाजप सोडणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजप सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.


एकनाथ खडसे यांनी फोन करून आपण भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले,  त्यामुळे आम्ही त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असे जयंत पाटील हे पत्रकार परिषदेत म्हणाले.सध्या फक्त एकनाथ खडसे यांचा प्रवेश होणार आहे. खडसे समर्थकांचा येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल अशी माहिती पाटील यांनी दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. खडसे समर्थकांनी भाजपचे कमळ ही निशाणी हटवत ‘भाऊ, तुम्ही बांधाल तेच तोरण आणि धोरण’ अशा स्वरूपाची बॅनरबाजी करण्यास जळगावात सुरुवात केली होती. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 22 तारखेऐवजी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 23 तारखेला होणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.

एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र हा मुहूर्त टळल्यानंतर 22 तारखेच्या मुहूर्ताची चर्चा सुरू झाली होती. ही तारीख देखील आता बदलली असून ती 23 ऑक्टोबर झाली आहे. मंगळवारी एकनाथ खडसे यांनी या विषयावर खुलेपणाने बोलणे टाळले होते.

20 ऑक्टोबर रोजी त्यांना काही पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, मी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही’ असे म्हटले होते. मात्र खडसे समर्थकांनी त्या आधीच कमळ हे भाजपचे चिन्ह बॅनरवरून हटवत जळगावमध्ये जोरदार बॅनरबाजी सुरू केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या