क्षुल्लक वादातून भाजपच्या महिला नेत्याने तरुणाचे डोळे फोडले

उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे एक संतापजनक प्रकार घडला आहे. रस्त्यावर झालेल्या एका क्षुल्लक वादातून भाजपच्या महिला नेत्याने एका तरुणाचे डोळे फोडले आहेत. सौम्या शुक्ला असं या भाजप नगरसेवकाचं नाव आहे. सौम्या हिच्यासह अंकित शुक्ला याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असली तरी अद्याप दोघांपैकी कुणालाही अटक झालेली नाही.

उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे हा प्रकार घडला आहे. पीडित तरुणाचं नाव अमनदीप भाटिया असं आहे. भाटिया आणि त्याची पत्नी गुनीत हे दोघे जेवण करून जीटी मार्गावरून परत येत होते. त्यावेळी शुक्ला यांची गाडी भाटियांच्या गाडीच्या पाठी होती. शुक्लाच्या गाडीने हॉर्न मारून पुढे जाण्यासाठी जागा देण्यास सांगितलं. पण, बाजूला ट्रक असल्याने भाटियांना गाडी बाजूला घेता आली नाही. काही वेळाने शुक्लाने त्यांची गाडी पुढे नेली आणि आडवी थांबवली. त्यामुळे भाटियांच्या गाडीला थांबावं लागलं.

गाडी थांबताच त्यातून काही लोक उतरले आणि अमनदीप यांना मारहाण करू लागले. या मारहाणीत अमनदीप यांच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली. त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमनदीप यांचा एक डोळा पूर्णतः निकामी झाला आहे. गुनीत भाटिया यांनी या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सौम्या शुक्ला आणि अंकित शुक्ला यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही.