
देशात एक कोटी सरकारी पदे रिकामी आहेत. घराघरांत बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत, परंतु त्यांना जाणीवपूर्वक नोकरी दिली जात नाही, अशा शब्दांत भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी नाव न घेता पेंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते पीलीभीत मतदारसंघात मतदारांशी बोलत होते.
दोनदिवसीय दौऱयावर आलेल्या वरुण गांधी यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली. बेरोजगार तरुण नोकरीविना फिरत आहेत. देशात फक्त परीक्षा होते. तीन वर्षांनंतर निकाल येतो. अर्धे पेपर तर रद्द केले जातात. आधी खूप नोकऱया होत्या. सध्या देशात एक कोटी सरकारी पदे खाली आहेत. बेरोजगार तरुणांना सरकार जाणीवपूर्वक नोकऱया देत नाही. कारण, नेत्यांना तो पैसा जमा करून निवडणुकीत फुकटच्या घोषणा करण्यासाठी वापरायचा असतो, असे ते म्हणाले. राजकारणात भ्रष्टाचार खूप वाढला आहे. पीलीभीतमध्ये मी सोडून सर्व नेते कमिशन घेतात. मोठमोठय़ा उद्योगपतींना 10-20 हजार कोटींचे कर्ज दिले जाते, परंतु सर्वसामान्यांना दोन लाखांचे कर्ज लवकर दिले जात नाही, अशी देशात परिस्थिती आहे, असे ते यावेळी म्हणाले.
























































