विधान परिषद निवडणुकीत उलटफेर, भाजपचे बालेकिल्ले ढासळले! महाआघाडीचा महाझटका!!

मराठवाडा पदवीधर, पुणे पदवीधर राष्ट्रवादीकडे

नागपूर पदवीधर, पुणे शिक्षकमध्ये काँग्रेस विजयी

अमरावतीत अपक्ष,

भाजप सहाव्या क्रमांकावर

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवून पुन्हा सत्तेवर येण्याचे दिवास्वप्न बघत सत्तास्थापनेचे मुहूर्त काढणाऱया भाजपचे विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील बालेकिल्ले साफ ढासळले.  संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड, पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा. जयंत आसगांवकर दणदणीत मतांनी विजयी झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार थेट सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारत महाविकास आघाडीच्या पारडय़ात भरभरून मते टाकली. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला महाझटका दिला आहे.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवून एकीचे बळ दाखवून दिले. महाआघाडीने अतिशय पद्धतशीरपणे व्यूहरचना केली होती.

सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक

या निवडणुकीत संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण, भाजपचे शिरीष बोरनाळकर यांच्यात प्रमुख लढत होती. सतीश चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. पाचव्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम होती. सतीश चव्हाण यांना 1 लाख 16 हजार 638 मते तर भाजपचे शिरीष बोरनाळकर यांना 58 हजार 473 मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 57 हजार 895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. सतीश चव्हाण यांनी हॅटट्रिक पूर्ण केली आहे.

नागपुरात भाजपच्या गडाला सुरुंग

भाजपचा भक्कम गड म्हणून ओळखल्या जाणाऱया नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा संपूर्ण गडच ढासळला आहे. मागील 58 वर्षांपासून  भाजपच्य ताब्यात असलेला हा मतदारसंघ कांग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपकडून हिसकावून घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल 25 वर्षे तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी 12 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, पण देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा दणदणीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत सतराव्या एलिमिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांनी कोटा पूर्ण केल्यामुळे वंजारी यांना 61 हजार 701 तर संदीप जोशी यांना 42 हजार 791 मते मिळाली.

पुण्यात अरुण लाड विजयी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा दणदणीत पराभव केला आहे. अरुण लाड यांनी तब्बल
48 हजार 824 मतांनी पहिल्या पसंतीच्या फेरीतच संग्राम देशमुख यांना अस्मान दाखवले. तर पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर  व भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार यांच्यात लढत होईल असे वाटले होते. पण जितेंद्र पवार थेट तिसऱया क्रमांकावर फेकले गेले आणि प्रा. जयंत आसगावकर विजयी झाले.

भाजप सहाव्या क्रमांकावर

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे, भाजपचे डॉ. नितीन धांडे व अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यात प्रमुख लढत होती; पण भाजपचे उमेदवार नितीन भांडे या निवडणुकीत सहाव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना केवळ 2 हजार 529 मते मिळाली. ते 21व्या फेरीतून बाद झाले. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले.

महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यात कमी पडलो

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत साफ आपटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हा पराभव जिव्हारी लागला असला तरी मान्य करावा लागला आहे. आमचा अंदाज चुकला. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं, अशी कबुली फडणवीस यांनी दिली.

निकाल

नागपूर पदवीधर                 अभिजित वंजारी   काँग्रेस

संभाजीनगर पदवीधर            सतीश चव्हाण      राष्ट्रवादी

पुणे पदवीधर                     अरुण लाड      राष्ट्रवादी

पुणे शिक्षक                      प्रा. जयंत आजगावकर       काँग्रेस

अमरावती शिक्षक                किरण सरनाईक    अपक्ष

सरकारचा प्रवासही ब्रेक न लागता वेगाने होणार!

महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे आघाडी सरकारचा पुढील प्रवासही असाच इलेक्ट्रिक बससारखा स्मूथ, पोल्युशन फ्री आणि ब्रेक न लागता वेगाने होणार आहे असा ठाम विश्वास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. बेस्टच्या ताफ्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

वर्षपूर्तीची चांगली भेट मिळाली

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचे यश मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीवर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. त्याच्यामुळे निश्चित आमचा हुरूप  वाढलेला आहे. एक वर्ष पूर्ण झाले त्याच्या निमित्ताने एखादी चांगली भेट मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी दिली.

देवेंद्र फडणवीसांनाही पराभूत करू

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्च शिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होत आहे. राज्यात ऑपरेशन लोटसच्या वल्गना करण्यात येत होत्या. अनेकदा तीनचाकी सरकार असं म्हटलं जात होतं. परंतु महाविकास आघाडीची ताकद भाजपाला लक्षात आली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होईल इतकी ही भक्कम आघाडी असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचं चित्र बदलतंय… बदलाला जनतेचा मोठा पाठिंबा!

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे हा विजय मिळाला आहे. या सरकारने गेल्या वर्षभर जे काम करून दाखवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील चित्र बदलत असून या बदलाला जनतेचा मोठा पाठिंबा आहे हे या विजयावरून स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. आता सर्वसामान्य लोकांनी तसेच सुशिक्षित मतदारांनी महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे अशा शब्दात शरद पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

भाजप प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य विनोदी

भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी वक्तव्य करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधान परिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले. गेल्या वेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते, त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

महाविकास आघाडीच्या कामाला मिळालेली पोचपावती

या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटित प्रयत्नांतून हा विजय साकारला आहे. हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

वाचाळवीरांना जबरदस्त चपराक

नागपूर आणि पुण्यात बऱयाच वर्षांपासून या मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मात्र हा निकाल त्या वाचाळवीरांना जबरदस्त चपराक असल्याचे अजित पवार म्हणाले.

एकटे लढून दाखवा

या निकालांमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. तीन पक्ष एकत्र येऊन एकाशी लढल्यावर वेगळं चित्र निर्माण होत नाही. असं असूनही आम्ही चांगला संघर्ष केला आणि निकराचा लढा दिला. मी या तिघांना आव्हान देतो की तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

बेसावध राहिलो, आत्मचिंतन करू

‘जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं याऐवजी भाजप बेसावध राहिली, असं म्हणणं योग्य ठरेल. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं आपण पदवीधरमध्ये जिंपून येतो, हा आभास होता नागपूर आणि पुणे या हक्काच्या जागा गमावणं हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. त्याचं चिंतन केलं जाईल. आम्ही बेसावध राहिलो, त्यामुळे निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करू, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आत्मचिंतनाची गरज भाजपलाच

आत्मचिंतनाची गरज शिवसेनेला नसून भाजपलाच आहे.  तीन चाकांच्या रिक्षाने आज बुलेट ट्रेनला हरवले, असा खोचक टोला परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपला लगावला. अमरावतीची जागा यापूर्वीदेखील शिवसेनेची नव्हती. याअगोदर तिथे अपक्षच निवडून आले होते व आतादेखील तिथे अपक्षच निवडून आले आहेत. ती जागा भाजपने आताही जिंकली नाही. याउलट भाजपने त्यांच्या परंपरागत निवडून येणाऱया नागपूर पदवीधरसारख्या जागा गमावल्या आहेत. त्यामुळे त्यांनीच आत्मचिंतन करावे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या

विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या, महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी. ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहू, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या फाजील आत्मविश्वासामुळे पराभव

भाजपचा जो पराभव झाला आहे. तो महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाचा फाजील आत्मविश्वास आणि ‘मी पुन्हा येईन’ या अहंपणामुळे हा पराभव झाला. नागपूर, पुण्यासारखा परंपरागत मतदारसंघ भाजपने गमावला. भाजपवरचा विश्वास कमी होतोय आणि महाविकास आघाडीवरचा विश्वास वाढतोय असं चित्र दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या