
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशभरात 17 टक्के मते ही दलित समाजाची आहेत. या मतांवर डोळा ठेवून भाजपने आज राजधानीत ‘पॉलिटिकल’ खिचडी शिजवली. रामलीला मैदानावरील ‘भीम महासंगम’ सभेत शेफ विष्णू मनोहर यांनी भाजपसाठी ही पाच हजार किलोंची दालखिचडी बनवून एक नवा रेकॉर्ड केला.
या खिचडीसाठी दिल्लीच्या सर्व 14 जिल्हय़ांतील सुमारे तीन लाख दलितांच्या घरातून डाळ-तांदूळ जमा करण्यात आला. एक हजार किलो तांदूळ, 300 किलो भाजी, 200 लिटर तूप, 100 लिटर तेल, पाच हजार लिटर पाणी असे सर्व जिन्नस एकत्र करून दहा बाय दहा फूट एवढय़ा आकाराच्या अजस्र कढईत ही ‘समरसता’ खिचडी शिजवण्यात आली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी दलितांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. देशात एकूण 20 कोटी 14 लाख दलित मते असून दीडशेहून अधिक मतदारसंघांत त्यांचा प्रभाव आहे. संसदेतील 131 खासदार दलित समाजाचे आहेत. हे सर्व गणित लक्षात घेऊनच भाजपने ही समरसता खिचडी बनवली आहे.
धरून पकडून खिचडी खाऊ घातली
या खिचडीत राजकीय फोडणी देतानाच भाजपने तब्बल 50 हजार दलित बांधव सभेला येतील असे म्हटले होते. मात्र उपस्थित राहीले फक्त आठ ते दहा हजार जणच. तशात खिचडी शिजायला उशीर झाल्याने अनेकजण उपाशीपोटीच निघून जाऊ लागले. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी जाणाऱयांना धरून पकडून खिचडी खाऊ घातली.




























































