1997 मध्ये झाला हिंदुस्थान स्वतंत्र, भाजप महापौरांनी तोडले अकलेचे तारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनोद मिश्रा, मुंबई

हिंदुस्थानला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं ती तारीख माहीत नाही, असा हिंदुस्थानी शोधूनही सापडणार नाही. पण थांबा, अशी एक हिंदुस्थानी व्यक्ती आहे, जिला हिंदुस्थानी स्वातंत्र्यदिनाबद्दल अज्ञान आहे. ती व्यक्ती आहे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भाजपच्या महापौर. नुकताच त्यांनी 1997मध्ये हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्याचा जाहीर उल्लेख केला आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण देताना मिरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांनी आजच्याच दिवशी १९९७मध्ये हिंदुस्थान स्वतंत्र झाला होता, असा उल्लेख केला. या विधानातली चूक सुधारण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या आमदार नरेंद्र मेहता यांनी या वक्तव्यावर टाळ्याही वाजवल्या. ते पाहून उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतरही डिंपल यांनी आपल्या भाषणात अनेक चुका केल्या. मात्र, त्या सुधारण्याऐवजी उपस्थित असलेले भाजपचे आमदार आणि इतर समर्थक गप्प राहिले. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे डिंपल यांच्यासमोर भाषणाचा कागद होता. त्यात बघून वाचल्यानंतरही त्यांनी तारखेत घोळ घातल्याचं समोर येत आहे.

पाहा व्हिडीओ-

अर्थात मिरा भाईंदरमध्ये अशा प्रकारच्या अक्षम्य चुका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भाजपचे नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी मिरारोड येथील वीरपुत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याच्या वृत्तानंतरही आपला वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी डिंपल मेहता आणि नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमुळे मिरा भाईंदरकरांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती.