भाजपचे मंत्री विखे-पाटलांची कबुली, झाकीर नाईकने 3 कोटींची देणगी दिली होती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रद्रोहाचा आरोप असणाऱ्या झाकीर नाईककडून 3 कोटी रुपयांची देणगी घेतली होती, अशी कुबली भाजप आमदार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. झाकीर नाईक यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टला देणगी म्हणून अडीच ते तीन कोटी रुपये दिले होते, असे विखे-पाटील म्हणाले.

झाकीर नाईककडून आर्थिक मदत घेणाऱया राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत बोलताना विखे-पाटील म्हणाले, झाकीर नाईकने 10 ते 15 वर्षांपूर्वी प्रवरा मेडिकल ट्रस्टला अडीच ते तीन कोटी रुपये दिले होते. त्याने ती देणगी दिली होती. ही देणगी 400 कोटी नव्हती. त्यानंतर याप्रकरणी चौकशी झाली होती. केंद्र सरकारने याप्रकरणी चौकशी पूर्ण करून 10 वर्षांपूर्वीच यासंदर्भातील केस बंद केली आहे, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

एनआयए काय कारवाई करणार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांनी आठवडाभरापूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असलेले विखे-पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईककडून साडेचार ते पाच कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती उघडकीस आणली होती. याप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. आता याबाबत विखे-पाटील यांनी स्वतःच कबुली दिली आहे. त्यामुळे एनआयए आता काय कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.