कोरोना घालवण्यासाठी भाजप आमदाराचा रस्त्यावर फिरून हवन, लॉकडाऊनचे उल्लंघन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेळगावमध्ये कोरोना रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. असे असताना भाजप आमदाराने बेळगावमध्ये कोरोना रोखण्यासाठी हवन यात्रा काढली आहे. यामुळे कोरोनाचे संकट संपेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आमदार अभय पाटील यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करत शेणाच्या गोवर्‍या, कापूर, धूप कडूनिंबाचा पाला वापरून हवन करत ते संपूर्ण शहरात फिरत आहेत. आहेत. पाटील म्हणाले की, “माझा आयुर्वेदावर विश्वास आहे. या हवनमुळे कोरोना महामारी संपेल अशी मला आशा आहे.” आपल्या विधानसभा मतदारसंघात 50 जणांनी आपल्या घराबाहेर हवन केल्याचे त्यांनी सांगितले, तसेच आपण कुठल्याही प्रकारे लॉकडाऊनचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी म्हटले.

ही हवन यात्रा 15 जून पर्यंत चालेल अशी माहिती पाटील यांनी दिली. तसेच हवन एक विज्ञान आहे, हिंदूंसाठी हवनचे महत्त्व असून तुम्हा पत्रकारांना याबाबत कळणार नाही, आस्था आणि श्रद्धेबाबत तुमच्याशी बोलून काहीच फायदा नाही असेही पाटील म्हणाले.

बेळगावमध्ये सोमवारी कोरोनाचे 447 रुग्ण आढळले होते तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बेळगावमधील एकूण रुग्णांचा आकडा 57 हजार 846 वर पोहोचली आहे. सध्या बेळगावमध्ये 17 हजार 441 सक्रिय रुग्ण आहेत.