सणांचा ताण असताना मिंधेंच्या गुंड पदाधिकाऱ्यांना 4-4 पोलिसांचे संरक्षण, भाजप आमदारांनी पुन्हा तोफ डागली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे दोघे भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा बॉम्बगोळा कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी टाकला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा मिंधे गटावर तोफ डागली आहे. सणांच्या बंदोबस्ताचा ताण असताना मिंधेंच्या गुंड पदाधिकाऱ्यांना चार-चार पोलिसांचे संरक्षण कुणाच्या मेहेरबानीने मिळत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

कल्याण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिंधे गटाकडून होत असलेल्या दडपशाहीला वाट मोकळी करून दिली. याचीच री ओढत आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटावर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. यानंतर दसरा, दिवाळीही येईल.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पाठोपाठ सण येत असल्याने पोलिसांवर प्रचंड ताण आहे. मात्र पोलिसांची मदत जनतेला मिळताना दिसत नाही. मिंधे गटाच्या गुंड पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला चार-चार पोलीस हवेतच कशाला, असा सवालच त्यांनी केला.

मुख्यमंत्री पुत्राने फाईल्स दाबून ठेवल्या

मी आमदार असूनही माझ्या विकासकामांच्या फाईल्स दाबून ठेवल्या जात असल्याचा घणाघात गणपत गायकवाड यांनी केला. हे कटकारस्थान कोण करत आहे हे सर्वांना माहीत आहे. कल्याण पूर्वेच्या विकासासाठी 129 कोटींचा निधी मी मंजूर करून आणला. मात्र खोटे बोलून हा निधी खासदारांच्या नावाने वापरला जात आहे. गार्डन आणि मैदानाच्या आरक्षित भूखंडावर मिंधेंच्या पदाधिकाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे केली आहेत. हे भूखंड कधी मोकळे होणार, असा सवालही त्यांनी पालिका आयुक्तांना केला आहे.