ज्यांना हिंदुस्थानात राहण्याची भीती वाटते त्यांनी अफगाणिस्तानात जावं, तिथं पेट्रोलही स्वस्त!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवाद्यांनी कब्जा केला आहे. यावरून हिंदुस्थानमध्ये राजकारण शिगेला पोहोचले आहे. सपा खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क यांनी तालिबानला समर्थन देण्याचे विधान केल्यामुळे वाद झाला होता. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हाही दाखल झाला. आता भाजपच्या एका आमदारानेही वादग्रस्त विधान केले आहे.

बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी ज्यांना हिंदुस्थानात राहण्याची भीती वाटते त्यांनी अफगाणिस्तानात जावे, असा सल्ला दिला आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा हिंदुस्थानवर कोणताही प्रभाव पडणार नाही. मात्र ज्या लोकांना हिंदुस्थानमध्ये राहण्याची भीती वाटते त्यांना मात्र अफगाणिस्तानचा रस्ता पकडावा. तिथे पेट्रोल-डिझेलही स्वस्त आहे, असे विधान भाजप आमदार हरिभूषण ठाकूर यांनी केले.

जेडीयू नेते गुलाम रसूल बलियावी यांना सर्व धर्माच्या लोकांना हिंदुस्थानात आणण्याच्या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘देश धर्माच्या नावावर विभागला गेला, हे लोक पुन्हा विभाजित होतील. हिंदुस्थानातील लोक आताच सावरले नाही, तर हिंदुस्थानही अफगाणिस्तान आणि तालिबान बनेल. लोक समजत नाहीत आणि ते केवळ मतांच्या चष्म्यातून हे सारं पाहत आहेत. हिंदुस्थानी लोकांनी अफगाणिस्तानकडे पाहून शिकायला हवं, असं ते म्हणाले आहेत.