
मध्यप्रदेशसह पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक होणार आहेत. तर 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र, तिकीट वाटपावरून भाजपमधील बेबनाव उघज होत आहे. तसेच या मुद्द्यावरून राडाही होत आहे. मध्य प्रदेशात भाजपाच्या विद्यमान आमदाराचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे आमदाराला रडू कोसळले आणि त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.
छतरपूर जिल्ह्यातील चंदला विधानसभेचे आमदार राजेश प्रजापती यांचे तिकीट भाजपने कापले आहे. यांनतर संतप्त झालेल्या प्रजापती यांनी थेट प्रदेशाध्यक्ष वी.डी शर्मा यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला. तिकीट देण्यात आलेला नेता आरोपी असून मटका खेळतो, असा आरोपही प्रजापती यांनी केला आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. अशा नेत्याच्या बाजूने कोण उभे राहणार? सर्वेत माझे नाव होते. तरीही तिकीट का नाकारण्यात आले, असा सवाल करत प्रजापती यांना रडू अनावर झाले.
यानंतर राजेश प्रजापती यांनी आपल्या कार्यकर्त्यांची आणि भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी आमदार विजय बहादूर सिंह हेही उपस्थित होते. बैठकीत तिकीट कापल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, तिकीट देण्यात आलेल्या उमेदवाराला विरोध करण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनांमुळे मध्य प्रदेशातील भाजपतील धुसफूस उघड होत असून या निवडणुका भाजपसाठी कठीण होण्याची चिन्हे आहेत.

























































