राष्ट्रवादीची अवस्था ‘गडी उभा राहिला, कोणी नाही पाहिला’ अशी – सुरेश धस

9332
suresh-dhas

योगेश मारणे, न्हावरे

‘गडी उभा राहिला, कोणी नाही पाहिला’, अशी अवस्था महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे, अशी टीका माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून लोक भाजप-शिवसेनेत का जात आहेत याचा विचार त्या पक्षाच्या नेत्यांनी करावा, असाही सल्ला धस यांनी यावेळी आपल्या भाषणात दिला.

शिरुर येथील न्हावरे येथे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुरेश धस बोलत होते. आपल्या भाषणात ‘मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है’, ‘दिलके तुकडे हजार हुए’, ‘कशी नशीबाने थट्टा मांडली’, यांसारखी चित्रपटातली गाणी म्हणत आपल्या मिश्किल शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना धस यांनी दोनही पक्षांना ‘वैतागवाडी सहकारी संस्था’ असे संबोधले. त्यांच्याकडे कामापेक्षा इतर वैतागतच जास्त असल्यामुळे त्यांचे नेते पक्ष सोडून इतर पक्षात जात आहेत. तर सर्व सामान्य जनता त्यांना वैतागली आहे. केवळ जनतेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारला मोठ्या प्रमाणावर जनता साथ देत आहे, असेही धस यांनी सांगितले.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीचा इतिहास, भूगोल माहीत नसल्यामुळे ते शिवस्वराज्य यात्रेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. देशातील महापुरुषांवर एखादे स्क्रिप्ट पाठांतर करून भूमिका करणे वेगळे आणि प्रत्यक्ष राजकारण करणे वेगळे. यात खूप फरक आहे. कारण राष्ट्रवादीत काहीही स्क्रिप्ट लिहून देणारे लोक आहेत, असाही टोला धस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. त्यामुळे जरा जपून बोलत चला असा सल्ला धस यांनी खासदार कोल्हे यांना दिला.

यावेळी भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल, मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हस्कुअण्णा शेंडगे, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या