भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची नरसी नामदेव संस्थानच्या विश्वस्तास मारहाण

नरसी नामदेव संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत जीर्णोद्धार समितीला हिशेब विचारताच भाजप आमदार तानाजी मुटकुळे गडबडले. दांडगाई करत त्यांनी हिशेब विचारणारे विश्वस्त अंबादास गाडे यांना बेदम मारहाण केली. मुटकुळे यांच्या कार्यकर्त्यांनी गाडे यांच्या पाठीत खुर्च्या घातल्या. एवढेच नाही, तर वडिलांना सोडवण्यासाठी आलेल्या मुलालाही झोडपून काढण्यात आले. आमदार मुटकुळे यांच्या दंडेलीवरून संतापाची लाट उसळली असून, कारवाईची मागणी होत आहे. भागवतधर्माची पताका थेट पंजाबपर्यंत फडकावणारे श्री संत नामदेव महाराज यांची जन्मभूमी नरसी नामदेव आहे. येथे नामदेव महाराजांचे प्रशस्त मंदिर बांधण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियमावलीनुसार मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ असून, 18 जानेवारी रोजी काही नव्या विश्वस्तांनाही त्यात संधी देण्यात आली आहे. मंदिराच्या बांधकामावर देखरेखीसाठी तात्पुरत्या स्वरूपात जीर्णोद्धार समिती स्थापन करण्यात आली होती. काही दिवसांपासून मंदिराला देण्यात येणाऱ्या देणगीसाठी वापरण्यात येणाऱ्या पावती पुस्तकावरून विश्वस्त आणि जीर्णोद्धार समितीमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी बैठकबा आली होती. या बैठकीला संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार नवनाथ वगवाड, सचिव द्वारकादास सारडा, सुभाष घुले, मनोज आखरे, भागवत सोळंके, राहुल नाईक, रमेश मगर, अंबादास गाडे तर जीर्णोद्धार समितीचे माधव पवार, गिरीश वरुडकर, नारायण खेडकर, के. के. शिंदे आदी उपस्थित होते.

बैठकीत मंदिर विकासाच्या अनुषंगाने झालेल्या खर्चाचा हिशेब आणि मंदिर संस्थानच्या वतीन देणगीसाठी वापरण्यात येणाऱ्या पावती पुस्तकावरून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सुरुवातीला मनोज आखरे यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याशीही त्यांचे वाजले. त्यानंतर संस्थानचे विश्वस्त अंबादास गाडे आणि आमदार मुटकुळे यांच्यात प्रचंड हमरीतुमरी झाली आणि त्याचे पर्यवसान गाडे यांना मारहाण करण्यात झाले. आमदार मुटकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी गाडे यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पाठीवर खुर्च्या तोडल्या. त्यांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. अंबादास गाडे यांना हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

‘पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार ‘

संत नामदेव मंदिराचे काम २०१९ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर जीर्णोद्धार समितीने हिशेब देणे अपेक्षित होते. परंतु, वारंवार मागूनही हा हिशेब देण्यात आला नाही. विशेष म्हणजे देणगी स्वीकारण्यासाठी चक्क बोगस पावतीपुस्तक वापरण्यात आले. देणगीचा तर हिशेब नाहीच, पण सोन्या-चांदीचाही हिशेब देण्यात आला नाही. यासंदर्भात विचारणा करताच आमदार तानाजी मुटकुळे यांनी दांडगाई करत मारहाण केल्याचे अंबादास गाडे यांनी सांगितले. या प्रकरणी आपण नरसी नामदेव पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही ते म्हणाले.