मोदी का जिंकतात…सेटींग सेटींग; ईव्हीएमवर कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील निवडणूक प्रक्रियेत भाजपकडून कशाप्रकारे सेटिंग लावली जाते याची धक्कादायक कबुलीच भाजपचे तेलंगणामधील खासदार डी. अरविंद यांनी दिली आहे. ईव्हीएमवर नोटा, कार, हात यापैकी कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच जाणार आणि मोदीच जिंकणार, असे विधान अरविंद यांनी केले असून मोदी का जिंकतात याची पोलखोलच यामुळे झाली आहे. या विधानानंतर विरोधी पक्षांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आता भाजपवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

पुढील वर्षी तेलंगणासह 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका तसेच 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार डी. अरविंद यांच्या विधानाने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएम मशीन हॅकिंगबाबत आरोप होत असताना डी. अरविंद यांनीच कोणतेही बटण दाबा, मत भाजपालाच जाणार असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळातून चोहोबाजूने टीकेची झोड उठत आहे. डी. अरविंद यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ निजामाबाद येथील पत्रकार परिषदेतील असल्याचे सांगितले जात आहे.

ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाडीवरून वाद

ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केली जात असल्याचे यापूर्वीच अशोका विद्यालयाच्या एका प्राध्यापकाच्या शोधनिबंधातून समोर आले आहे. त्यामुळे आधीपासूनच या मुद्दय़ावरून वादविवाद होत आहेत, मात्र डी. अरविंद यांच्या विधानामुळे आता ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्दय़ाला बळ मिळाले असल्याचे निजामाबादच्या माजी खासदार कविता यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करणार का? काँग्रेसचा सवाल

निवडणूक जिंकण्यासाठी ईव्हीएम मशीन हायजॅक केल्या जातात असे खुद्द भाजपचा खासदारच म्हणत आहे. निवडणूक आयोग यावर काही कारवाई करणार आहे का, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे, तर अखेर रहस्य उघड झाले, अशा शब्दांत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर टीका केली आहे. त्यांनी खासदार अरविंद यांचा व्हिडिओही पोस्ट केला आहे.

– ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी होत्या, मात्र भाजप आमदाराच्या तोंडूनच आता सत्य बाहेर आले आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. त्यांनी अशी सेटिंग केलीय की कुणालाही मत द्या मत भाजपलाच जाणार. त्यामुळे सर्व संस्थाना आपल्या धाकात ठेवणारा भाजप पक्ष देशासाठी मोठे संकट आहे, असा हल्ला काँग्रेसने व्हिडिओतून चढवला आहे.

– 2014 च्या लोकसभा निवडणूक काळात अनेक ठिकाणी ट्रक आणि टेम्पोंमध्ये ईव्हीएम मशीन सापडल्या होत्या. एका आरटीआयनुसार 2016 ते 2018 या कालावधीत देशात 19 लाख ईव्हीएम गायब झाल्या आहेत. नंतर व्हीव्हीपॅट मशीन आणल्या गेल्या. 19 लाखांपैकी 6 लाख मशीन नादुरुस्त होत्या अशी माहितीही पुढे आली. त्यावरून निवडणूक प्रक्रियेला भाजपची वाळवी लागली आहे हे स्पष्ट होते.

बीआरएस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. डी. अरविंद यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम हॅकाRगचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा आणि डी. अरविंद यांची त्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर चौकशी करावी अशी मागणी बीआरएसकडून करण्यात येणार आहे. याप्रकरणी लवकरच निवडणूक आयोगाला निवेदन देणार असल्याचे बीआरएसने म्हटले आहे.

डी. अरविंद हे निजामाबादचे खासदार असून त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांचा पराभव केला होता.