
पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आज राज्यसभेत उमटले. बीरभूममधील दुर्दैवी घटना ही पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याचे स्पष्ट करणारी आहे. त्यामुळे बंगालमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजपने आज राज्यसभेत केली. यावरून सभागृहात काही काळासाठी जबरदस्त हंगामाही झाला व कामकाज तहकूब करावे लागले.
राज्यसभेत कामकाज सुरू होताच भाजप सदस्यांनी बीरभूमचा मुद्दा उपस्थित करत घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज काही वेळासाठी तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरळीत पार पडले.
लोकसभेत दिल्ली महापालिका विधेयक
दिल्लीतील तीन महापालिकांचे विलीनीकरण करून एकच महापालिका व एकच महापौर अशी नवी रचना असणारे विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आले.
रूपा गांगुली ढसाढसा रडल्या
शून्य प्रहरात बीरभूमच्या मुद्दय़ावर बोलण्याची संधी भाजपच्या रूपा गांगुली यांना मिळाली. बीरभूममध्ये जे घडत आहे त्याचे वर्णनही करता येत नाही, असे सांगत गांगुली यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. बीरभूमच्या घटनेने बंगालमध्ये कायद्याचे राज्य शिल्लक नसल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली.































































