आरोपींची बाजू घेणे पडले महागात, भाजप आमदाराला कारणे दाखवा नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये गोळीबारातील आरोपीची बाजू घेणे आमदार सुरेंद्र सिंह यांना महागात पडले आहे. भाजपध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सिंह यांना फोन करुन सुनावले असून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

उत्तर प्रदेशच्या बलियमध्ये गोळीबार झाला होता. भाजपच्याच एका कार्यकर्त्याने एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. आमदार सुरेंद्र सिंह यांनी थेट अरोपीची भेट घेऊन त्याचे समर्थन केले होते. तसेच आरोपी क्षत्रिय असल्याने आपण त्याच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावरून भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सिंह यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नड्डा यांनी सिंह यांना फोन करून याबाबत सुनावले आहे. या प्रकरणी सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. इतकेच नाही तर या प्रकरणाच्या तपासापासून दूर रहा असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा हाथरस बलात्कार घडला तेव्हाही सुरेंद्र सिंह यांनी एक अजब विधान केले होते. मुलींवर संस्कार केल्यास बलात्कारसारखी प्रकरणे घडणार नाहीत असे सिंह म्हणाले होते. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती.