देश महत्वाचा की ‘वोट बँक’ हे एनआरसीला विरोध करणाऱ्यांनी आधी ठरवावे ! अमित शाहांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

आसाम अकॉर्डवर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि यापूर्वी आसाममधील घुसखोरांविरोधातील आंदोलनाला ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला होता. आता मात्र तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने बांगलादेशी वोट बँकेसाठी एनआरसीला विरोध सुरु केला आहे. देशाची सुरक्षा महत्वाची की वोट बँक हे आधी ममता व राहुल गांधी यांनी ठरवावे, असा हल्लाबोल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कोलकाता  येथील जाहीर  सभेत बोलताना आज केला.

यावेळी  ममतांवर टीका करताना शाह यांनी  येथील बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, बांगलादेशी घुसखोर हे ममता बॅनर्जी यांची व्होटबँक आहे. त्यामुळेच त्यांचा पक्ष तृणमुल काँग्रेस एनआरसीचा विरोध करत आहे.   राज्य सरकारवर आरोप करताना  शाह म्हणाले,“ भाजपचा आवाज जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकारने बंगाली चॅनेलही बंद केले आहेत. भाजप बंगालविरोधी असल्याच्या पोस्टरवर भाष्य करताना, भाजप बंगालविरोधी  असून शकत नाही कारण भाजपचे संस्थापक स्वतः बंगाली होते. मात्र, आम्ही ममताविरोधी जरूर आहोत”, अशा शब्दांत शाह यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

वोट बँकेसाठी यांचे घुमजाव 

एक काळ होता जेव्हा बांगलादेशी घुसखोर हे कम्युनिस्ट पार्टीची व्होटबँक होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी लोकसभेत गोंधळ घालत बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याची मागणी केली होती. मात्र, आता हेच घुसखोर तृणमुलची व्होटबँक बनल्यावर  ममता यांनी पूर्वीच्या भूमिकेवरून घुमजाव केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही भाजप विरोधासाठी ममतांची पाठराखण करीत आहेत. या दोघांनीही जाहीर करावे की आपण देशाला महत्व देता की वोट बँकेला, अशी मागणी शाह  यांनी आपल्या भाषणात केली.

शाह बांगलातील (पश्चिम बंगाल) मेयो रोड वरील रॅली फ्लॉप झाल्याने ते आमच्यावर बेलगाम आरोप करीत आहेत. आमच्या पक्षाच्या संस्कृतीत चॅनेल ब्लॅक आऊट आणि मीडियाला ब्लॅकमेल करणे असे प्रकार बसत नाहीत. तो सर्व भाजपचा अजेन्डा आहे,  अशी टीका तृणमूल काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात करण्यात आली आहे.