मैत्री कोणाशी करायची हे वाघ स्वतः ठरवत असतो, संजय राऊत यांचा पाटलांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाघाशी कधी मैत्री होत नसते. कोणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवत असतो, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हाणला.

उत्तर महाराष्ट्र दौऱयावर आलेले खासदार संजय राऊत हे आज नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले तर आपण वाघाशीसुद्धा मैत्री करायला तयार आहोत, असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर संजय राऊत म्हणाले की, वाघ हा वाघ असतो. त्याच्याशी कधी मैत्री होत नसते. कोणाशी मैत्री करायची हे वाघ स्वतः ठरवत असतो. पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा! त्यांना कोणाशी मैत्री करायची आहे याची यादी त्यांनी पाठवावी. यावर आपण काम करू. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काम समन्वयाने सुरू आहे. ते असेच चालू राहावे यासाठीही बैठका होत असतात, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. सात वर्षांत भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱयामुळेच यश प्राप्त झाले आहे. ते भाजपचे सर्वोच्च नेते आहेत. पंतप्रधानांनी निवडणुकांच्या प्रचाराला पंतप्रधान म्हणून जाऊ नये, पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करू नये, ही भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे मांडली. ती भूमिका शिवसेनेची आजही कायम आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.