
भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. सोलापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
सांगोल्यातील भाजपचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याचा एका महिलेला बेडरूममध्ये मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे जिह्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओनंतर देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्याची सर्वत्र मागणी केली जात होती. या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि नंतर तो सोलापूर येथील सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.
या प्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयात देशमुख याने जामीन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत पीडितेच्या वकिलांनी पीडित महिलेला प्रकरण मागे घेण्यासाठी धमक्या येत असून तिच्या जिवाला धोका असल्याचा युक्तिवाद केला. तसंच, आरोपी हा राजकीय पार्श्वभूमी असलेला आहे. त्यामुळे तो पळून जाण्याची दाट शक्यता असल्याने त्याला जामीन मंजूर करू नये, असंही पीडितेच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिलं.
पीडितेच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार, पीडित महिला पुण्यातील असून, त्यांची काही वर्षांपूर्वी देशमुखसोबत ओळख झाली होती. त्यावेळी पत्नीशी मतभेद झाल्यामुळे तिला लवकरच घटस्फोट देणार असल्याची बतावणी देशमुख यांनी महिलेकडे केली होती. त्यानंतर देशमुख यांनी महिलेवर बलात्कार केला. आरोपी देशमुख हा चांगल्या वर्तणुकीचा नसून त्याला जामीन मागण्याचा अधिकार नसल्याची मागणीही पीडितेच्या वकिलांनी केली. सोलापूर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी या प्रकरणी पीडितेकडून केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून देशमुख याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.


























































