सुषमा स्वराज यांची शेवटची इच्छा मुलीने केली पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत भाजप नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची शेवटची इच्छा त्यांच्या मुलीने पूर्ण केली. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात हिंदुस्थानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी हिने शुक्रवारी एक रुपयाचे शुल्क दिले. बासुरीने आईची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचे स्वराज कौशल यांनी ट्विट केले.

‘‘तुमची कन्या बासुरी हिने आज तुमची शेवटची इच्छा पूर्ण केली. कुलभूषण जाधव प्रकरणातील वकील हरीश साळवे यांच्याकडे तिने एक रुपयाचे शुल्क सुपूर्द केले, जी तुमची इच्छा अधुरी राहिली होती’’ अशा प्रकारचे भावनिक ट्विट सुषमा स्वराज यांना उद्देशून त्यांचे पती स्वराज कौशल यांनी केले. सुषमा स्वराज यांनी निधनाच्या एक दिवस आधी हरीश साळवे यांना फोनवरून संपर्क साधला आणि कुलभूषण जाधव प्रकरणात हिंदुस्थानला यश मिळाल्याबद्दल एक रुपयाचे शुल्क घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र पुढील दहा मिनिटांतच सुषमा स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे सुषमा स्वराज यांची ती इच्छा अपूर्ण राहिली होती.