
सामना ऑनलाईन। झारखंड
झारखंडमधील पाकुड जिल्हयात सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्नीवेश यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. स्वामी अग्नीवेश यांच्या झारखंड दौऱ्याला भाजप युवा मोर्चाने विरोध दर्शवला होता. ‘अग्नीवेश गो बॅक’ अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. सुरूवातीला कार्यकर्त्यांनी अग्नीवेश यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला. पण नंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. संतप्त कार्यकर्त्यांनी अग्नीवेश यांना ढकलले. ते खाली पडताच त्यांना लाथाबुक्कयांनी तुडवण्यात आले. यात त्यांचे कपडेही फाटले. त्यांची पगडीही फाडण्यात आली. यावेळी जय श्री राम अशी घोषणा देत कार्यकर्त्यांनी अग्नीवेशांना देश सोडून जाण्यास सांगितले.
स्वामी अग्नीवेश मंगळवारी पाकु़ड जिल्हयातील लिट्टीपाडातील डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाला संबोधित करणार होते. या सभेचे आयोजन अखिल भारतीय आदिम जनजाति विकास समितीने केले होते. सभेआधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली. यामुळे संतप्त भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अग्नीवेश हॉटेल बाहेर येताच त्यांच्यावर हल्ला केला. ते पाकुड येथे पोहचताच आरएसएस व भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.
सभेत अग्नीवेश यांनी केलेल्या भाषणावर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता नाराज होते. अग्नीवेश ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या इशाऱ्यावरून आदिवासी समाजाला भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अग्नीवेश यांना मारहाण झाल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी स्वामी यांची आंदोलनकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.
दरम्यान, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्वामी अग्नीवेश यांनी केली आहे. तसेच घटना घडली तेव्हा तिथे पोलीस नव्हते असेही ते म्हणाले. तसेच आंदोलन न करता चर्चा करा असेही आपण आंदोलनकर्त्यांना म्हटल्याचं स्वामींनं म्हटल आहे.
There was no police personnel present there. Even when I repeatedly called SP & DM they didn’t turn up. I was told that ABVP & BJP Yuva Morcha workers want to protest. I told them there’s no need to protest, they can come in & talk. No one came in at that time: Swami Agnivesh pic.twitter.com/szs6FK86KO
— ANI (@ANI) July 17, 2018



























































