मंडलिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा; महाडिक यांच्या विरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

मिंधेंच्या नकली सेनेकडून छत्रपतींच्या गादीचा घोर अपमान झाला. याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटत असतानाच, आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मतदारांना आमिष दाखवल्याचे उघडकीस आले आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा अवमान केल्याप्रकरणी मिंधे गटाचे उमेदवार संजय मंडलिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा.मतदारांना पाच कोटींचे आमिष दाखविणाऱया महाडिकांवरही कारवाई करा, अशी मागणी करणारी तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाकपचे शहर सचिव रघुनाथ विष्णू कांबळे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱयांकडे केली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी मतदारांना आमिष दाखविल्याबाबत तक्रार दिली आहे.