
पालिकेच्या वांद्रे-कुर्ला कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्राने उपचार आणि लसीकरण अशा दोन्ही पातळय़ांवर आघाडी घेत काम केले आहे. या ठिकाणी मिळणाऱया दर्जेदार उपचारांमुळे आतापर्यंत हजारो रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 16 जानेवारी रोजी या ठिकाणी राज्यातील लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर आतापर्यंत 1 लाख 65 हजार जणांना लस देण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱयांच्या सहाय्यातून हे काम सुरू आहे.
कोविड उपचारांबरोबरच बीकेसी सेंटरमध्ये लसीकरणही वेगाने सुरू आहे. या ठिकाणी लाभार्थ्यांना आवश्यक व्यवस्था निर्माण करून काम सुरू आहे. आतापर्यंत लस घेतलेल्यांमध्ये आरोग्य सेवा कामगारांची संख्या 20,150 आहे, फ्रंटलाइन कामगार 45 हजार 400 इतकी आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱयांची संख्या 57 हजार आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱयांची संख्या 42 हजार 450 आहे. बीकेसीच्या कामासाठी वेद फाऊंडेशनसारख्या सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
असे होतेय काम…
- बीकेसी लसीकरण केंद्रात कोविशिल्ड, कोवॅक्सिनची लस देण्यात येत आहे. नोंदणीपासून ते हेल्पडेस्कपर्यंत या ठिकाणी सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लसीकरण सुरक्षित आहे’ असे जिंगलही तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी कौतुक केले आहे.
- काम करणाऱया डॉक्टर-कर्मचाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी शून्य भेदभाव दिन, ‘निरोगीपणा’साठी कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय महिला दिन, 20 मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्यात आला. यामध्ये 100 वर्षांच्या वृद्धेचा लसीकरणाला वाढदिवस साजरा करणे, बालरुग्णाचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
108 आयसीयू, 12 डायलिसिस, सीटी स्कॅन
बीकेसी कोविड सेंटरमध्ये मिळणाऱया दर्जेदार उपचारांमुळे आतापर्यंत हजारो रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 108 आयसीयू, 12 डायलिसिससह ऑक्सिजन बेडमुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळत आहेत. याशिवाय गंभीर रुग्णांसाठी एचडीयू युनिट, कंटेनर आयसीयू, स्वतंत्र बालरोग वॉर्ड, विशेष वॉर्ड, रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी सल्लागार, सीटीस्कॅन आदी अद्ययावत आरोग्य सुविधा आहेत.


























































