
शुक्रवारी शहरात झालेल्या वाहन अपघातांत चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातप्रकरणी वाकोला, निर्मलनगर आणि वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपींना अटक केली आहे.
पहिला अपघात शुक्रवारी सकाळी खेरवाडी रोड येथे घडला. अब्दुल गफार हा मुलगा खेरवाडी येथे खेळत होता. तेव्हा भरधाव टॅक्सीने त्याला धडक दिल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास करून टॅक्सीचालक सुनील राजबहादूर राजपूत याला अटक केली.
तर दुसरा अपघात सायंकाळी वडाळा परिसरात घडला. भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण हे जखमी झाले आहेत. वडाळा येथे राहणाऱया वैशाली गुरव या शुक्रवारी सायंकाळी पती सुनील, मुलगी आकांक्षा, मुलगा चैतन्य आणि तिची वाहिनी प्रतिभा याच्यासोबत मंदिरात गेले होते. तेथून परत येत असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये सुनील, प्रतिभा, चैतन्य, आकांक्षा हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वडाळा पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यावर प्रतिभाचा तर उपचारादरम्यान चैतन्यचा मृत्यू झाला. वैशालीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालक रामजीत लोधीला अटक केली.
तर तिसरा अपघात शुक्रवारी रात्री वाकोला येथील हंसभुग्रा मार्ग येथे घडला. गोवंडी येथे राहणारा अरमान शाह आणि अबरार शेख हे दोघे मोटारसायकलने माहीमला जात होते. तेव्हा त्याच्यासोबत असलेले मोटारसायकलस्वार तरुण हे पुढे निघून गेले. अबरार हा रस्ता विसरल्याने तो वाकोला येथील हंसभुग्रा येथील एक दिशा मार्गावरून सुसाट वेगात मोटारसायकल चालवत होता. तेव्हा समोरून सिमेंटचा ट्रक येत असल्याने अबरार हा घाबरला. त्याचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकलवरून ते दोघे खाली पडले. या अपघातात ते दोघेही जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच वाकोला पोलीस घटनास्थळी गेले. उपचारादरम्यान अरमान शाहचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूप्र्रकरणी वाकोला पोलिसांनी अबरार शेखला अटक केली.






























































