
कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील तुकाराम राऊळ यांच्या आंबा, काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या 7 ते 8 फूट खोल पाण्याच्या टाकीमध्ये काळा बिबट्या (ब्लॅक पँथर) पडल्याची घटना गुरूवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव पथकाने 7 ते 8 फूट खोल टाकीमध्ये पिंजरा सोडत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या बिबट्याला पिंजऱ्यात घेत सुखरुप बाहेर काढत त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचा हा पहिलाच रेस्क्यू असल्याची माहिती कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली.
भक्ष्याच्या मागे धावत असताना हा बिबट्या टाकीत पडला असावा. हा बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचा आहे. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. काळा बिबट्या अत्यंत दुर्मिळ बिबट्याची प्रजाती असून जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ब्लॅक पँथरचा हा पहिलाच रेस्क्यू आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी सांगितले.
हे बचावकार्य उपवनसंरक्षक (सावंतवाडी) शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (सावंतवाडी) आय. डी. जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (कुडाळ) अमृत शिंदे, वनपाल (नेरूर त. हवेली) धुळु कोळेकर, वनपाल (मठ) अ. स. चव्हाण, वनपाल (मालवण) श्रीकृष्ण परीट, वनरक्षक (नेरूर त. हवेली) सावळा कांबळे, वनरक्षक (मठ) सुर्यकांत सावंत, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिकांच्या मदतीने यशस्वी केले.
बिबट्या भक्ष्याच्या शोधात रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळनारे प्राणी बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांपासून ते लहान आकाराची हरणे यांवरती ते उपजीविका करतात. बिबट्या हा अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे. काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ आहे.































































