
सामना ऑनलाईन । लंडन
अगदी मोगली चित्रपटात दाखवला होता तसाच ब्लॅक पँथर आफ्रिकेच्या जंगलात आढळला आहे. ब्रिटनच्या विल बुरार्ड लुकाल या 35 वर्षीय फोटोग्राफरने या ब्लॅक पँथरला कॅमेऱयात टिपला असून आफ्रिकेत 100 वर्षांत पहिल्यांदाच हा प्राणी कुणी कॅमेऱयात कैद केल्याचा दावा विलने केला आहे. हा प्राणी अतिशय कमी संख्येने दिसतो. त्याचे दर्शन 1909 मध्ये झाले होते.
विल हा एक बायोलॉजिस्ट असून गेल्या काही दिवसांपासून परिसरात ब्लॅक पँथर पाहिल्याचीच चर्चा होती. त्यानंतर विलने या ठिकाणी एक हाय क्वालिटी डीएसएलआर कॅमेरा सेट केला होता. विलने कॅमेऱयासोबत वायरलेस मोशन सेन्सर आणि तीन फ्लॅश लाइटस् या उपकरणाचा वापरही केला होता. विलने काढलेला फोटो हा ब्लॅक पँथर आहे. पौर्णिमा असल्यामुळे अंधुकसा प्रकाश होता. त्याचबरोबर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. त्यावेळी ब्लॅक पँथरचे फोटो घेतले गेले. ब्लॅक पँथर ही स्वतंत्र जात नसली तरीही गुणसूत्रांमधील बदलामुळे हा प्राणी संपूर्ण काळा दिसतो. त्यामुळे तो अतिशय आकर्षक दिसतो.


























































