काळ्या मुंग्या चावत नाहीत, मग लाल मुंग्या का चावतात? वाचा काय आहे कारण…

मुंग्या माश्यांप्रमाणे सर्वांना परिचित असून जगातील सर्व देशांत आढळतात. फार पुरातन कालापासून मानवाच्या सन्निध राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख अनेक जुन्या ग्रंथात आणि कथांमध्ये मिळतो. लाल मुंगी चावते म्हणून ती वाईट आणि काळी मुंगी गुदगुल्या करते म्हणून ती चांगली, असे अनेकांना त्यांच्या बालपणी वाटले असेल. मात्र या मागचे कारण वेगळेच आहे. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल माहिती सांगणार आहोत.

मुंग्यांमध्ये उदराच्या शेवटी नांगी असते आणि त्यालगत फॉर्मिक ॲसिडच्या ग्रंथी असतात. मुंगी चावते म्हणजे ती जबडा आपल्या त्वचेत घुसवते आणि सोबतच नांगीतले फॉर्मिक ॲसिड त्वचेवर सोडते. दोन्ही क्रिया एकत्र करत असताना मुंगी चावताना वाकडी झाल्याचे आपण पाहिलेच असणार. फॉर्मिक ॲसिड दाहक असते म्हणूनच मुंगीने चावा घेतल्यास या ॲसिडमुळे त्वचेवर जळजळ होते.

काळ्या मुंग्या सुद्धा चावतात आणि त्यांच्या नांगीमध्ये सुद्धा फॉर्मिक ॲसिड असते. मात्र त्या ॲसिडचे कॉन्सनट्रेशन लाल मुंगीच्या फॉर्मिक ॲसिडपेक्षा कमी असल्या कारणाने त्याची दाहकता कमी असते, म्हणून काळी मुंगी चावली तरी त्वचेवर जळजळ होत नाही.

काळा मुंगळा मात्र चावतो, अगदी रक्त निघेपर्यंत. अशावेळी मुंगळ्याला ओढून काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचे धड डोक्यापासून वेगळे होते. तरीसुद्धा मुंगळ्याचे डोके त्वचेला चिटकून राहते. कारण त्याचा जबडा त्वचेच्या आत घुसलेला असतो. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना राहुल जाधव यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या