पाकिस्तानात बाजारात धमाका; 20 ठार, 48 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । क्वेट्टा

पाकिस्तानातील सर्वात अशांत शहर म्हणून ओळख असलेल्या क्वेट्टा शहरातील भाजीबाजारात जबरदस्त धमाका झाला. या स्फोटात 20 जण ठार झाले असून 48 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश शिया हजारापंथियांचा समावेश आहे. या स्फोटाची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेली नाही.

क्वेट्टा शहरातील भाजीबाजारात सकाळी साडेसात वाजता हा स्फोट झाला. आयईडी बॉम्ब भाज्यांमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की बाजारातील लोक अक्षरशः हवेत उडाले. घटनास्थळावर क्षणार्धात रक्तामांसाचा चिखल झाला. या घटनेत आतापर्यंत 20 जण ठार झाल्याचे बलुचिस्तान प्रांताचे गृहमंत्री जियाउल्लाह लंगाव यांनी सांगितले. क्वेट्टाचे पोलीस उपमहानिरीक्षक अब्दुल रज्जाक चिमा यांनीही शिया हजारा समाजाला निशाणा बनवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

स्फोटात जखमी झालेल्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात चार सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही तडे गेले. स्फोटाच्या घटनेनंतर पोलिसांनी लगेच परिसराची घेराबंदी केली. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.