कोजागरीचा चंद्र असेल ’ब्लू मून’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 31 ऑक्टोबर रोजी ‘ब्ल्यू मून’ योग आहे. महिन्यातून एकदा होणारे पूर्ण चंद्राचे दर्शन, चालू महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ‘ब्लू मून’ असे म्हटले जाते.

ब्लू मूनविषयी अधिक माहिती देताना, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणाले, एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ असे म्हटले जाते. परंतु या दिवशी चंद्र प्रत्यक्षात निळा दिसत नाही. त्यामुळे खगोलशास्त्रीय दृष्टय़ा ब्ल्यू मून योगाला तसे विशेष महत्त्व देण्यात येत नाही.

1 ऑक्टोबर रोजी अधिक आश्विन पौर्णिमा होती आणि 31 ऑक्टोबर रोजी निज आश्विन पौर्णिमा येत आहे. यापूर्वी 31 मार्च 2018 रोजी ‘ब्ल्यू मून’ योग आला होता. आता यानंतर 31 ऑगस्ट 2023 रोजी ‘ब्ल्यू मून’ योग येणार आहे. शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी आश्विन पौर्णिमा सुरू होईल.

त्या दिवशी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री कोजागरी पौर्णिमा साजरी होईल. त्यामुळे यावेळच्या कोजागरीचा चंद्र हा ‘ब्ल्यू मून’ असणार आहे. शनिवार 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 18 मिनिटांनी आश्विन पौर्णिमा समाप्त होईल, असे सोमण यांनी स्पष्ट केले.