पावसाळय़ाआधी 100 टक्के नालेसफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई
पालिकेच्या माध्यमातून मुंबईभरात सुरू असलेले नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यंत 90 टक्क्कांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी छोटय़ा प्रमाणात शिल्लक असलेले काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून पावसाळ्याआधी 100 टक्के नालेसफाई पूर्ण होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नुकताच घेतला. यामध्ये पावसाळय़ात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नालेसफाईवर विशेष चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबईत 23 मेपर्यंत 90 टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याची माहिती यावेळी पर्जन्य जलवाहिन्या  खात्याकडून देण्यात आली. दरम्यान, दरवर्षी 10 एप्रिलपासून सुरू होणारी नालेसफाई पालिकेने या वर्षी दहा दिवस आधीच म्हणजे 1 एप्रिलपासून सुरू केली आहे.

रेल्वे हद्दीतील काम क्रॉस चेक करणार
पालिकेकडून नालेसफाई केली जात असली तरी रेल्वे हद्दीतील नाले तुंबल्याने वाहतूक खोळंबल्यास पालिकेवर टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर रेल्वे हद्दीतील नालेसफाईवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यामध्ये व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणी करण्यात येत आहे. शिवाय रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा घेऊन आवश्यक काम सुचवण्यात आले आहे. हे काम पुन्हा क्रॉस चेक केले जाणार आहे.

  • पालिकेने मुंबईभरातील नालेसफाई तीन टप्प्यांत वर्षभर करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी पालिकेकडून 154 कोटी रुपये खर्च केला जात आहे.
  • 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2020 पर्यंत तिसऱ्या टप्प्यात उर्वरित 15 टक्के काम केले जाणार आहे.
  • यामध्ये पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत 70 टक्के काम केले जाणार असून 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत या दुसऱ्या टप्प्यात 15 टक्के काम होणार आहे.
  • वर्षभरातील 100 टक्के नालेसफाईपैकी 70 टक्के काम पावसाळय़ाआधी 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. यातील 90 टक्के काम 23 मेपर्यंत पूर्ण झाले असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

23 मेपर्यंतची टक्केवारी

  • शहर-89
  • पूर्व उपनगर-87
  • पश्चिम उपनगर-81
  • शहरातील मोठे नाले-83
  • शहरातील छोटे नाले-67
  • पूर्व उपनगरातील मोठे नाले-91
  • पश्चिम उपनगरातील मोठे नाले -85
  • पूर्व उपनगरातील छोटे नाले-83
  • पश्चिम उपनगरातील छोटे नाले-61
  • शहरातील छोटे नाले-67