पालिकेच्या ‘बालकोत्सवा’ला शिवसेनाप्रमुखांचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी साजरा करण्यात येणाऱया ‘बालकोत्सव’ सांगीतिक सोहळ्याला आता ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नाव देण्यात येणार आहे. याबाबतच्या शिवसेनेने मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

पालिका शाळांत शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी गाणी, नृत्य, संगीताच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड स्तरावर पालिका स्पर्धा आयोजित करते. यामध्ये प्रत्येक शाळा, नंतर वॉर्ड आणि नंतर जिल्हा स्तरावर ही स्पर्धा होते. यानंतर अंतिम भव्य प्रदर्शन सोहळाही होतो. या ‘बालकोत्सव’ सोहळ्याला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नाव द्यावे असा प्रस्ताव तत्कालीन शिवसेना नगरसेवक अरुण (अरविंद) दुधवडकर यांनी मांडला होता. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा देत प्रस्ताव मंजूर करून आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कलाकार असलेल्या बाळ केशव ठाकरे यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात व्यंगचित्रांच्या माध्यमातून केली होती. अतिशय संवेदनशील व कलासक्त स्वभावामुळे समाजातील विविध घटकांकडे ते कलाकाराच्या नजरेने पाहत. सिने, नाटय़, कलासृष्टीतील कलावंतांबद्दल त्यांना आस्था व प्रेम होते. त्यांच्या या कलासक्त कार्याचे महत्त्व मुलांमध्ये रुजविण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून बालकोत्सवाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ हे नाव देणे संयुक्तिक ठरेल, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

…म्हणूनच केली मागणी

व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून समाजातील अनिष्ट प्रथांवर आसूड ओढून जनतेच्या मनात आत्मसन्मान जागवला. संयुक्त महाराष्ट्राची आग धगधगत ठेवण्याचे कार्य केले. उत्तम वक्ते आणि संघटन काwशल्य त्यांच्याकडे होते. स्वतः कलावंत असलेल्या बाळासाहेबांना सिने-नाटय़, कलासृष्टीतील कलावंतांबद्दल आस्था व प्रेम होते. अशा कलासक्त थोर व्यक्तीच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी बालकोत्सवाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नामकरण करण्यात यावे असे तत्कालीन नगरसेवक अरुण (अरविंद) दुधवडकर यांनी मांडलेल्या ठरावात म्हटले आहे.