
पश्चिम उपनगरातील अंधेरीपासून मालाडपर्यंतच्या परिसरातील सात पूल पालिका नव्याने बांधणार आहे, तर सहा ब्रीजच्या मोठय़ा दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. या कामासाठी करांसह पालिका 17 कोटी 75 लाख 46 हजार रुपये खर्च करणार आहे.
पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्वपासून मालाडपर्यंतच्या वाहतूक पूल, पादचारी पूल, पालिका हद्दीमधील रेल्वे पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट मे. सी. व्ही. कांड कन्सल्टंटस प्रा. लि. कडून करून घेण्यात आले. या तांत्रिक सल्लागाराने सुचवलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार मोडकळीस आलेल्या पुलांची नव्याने बांधणी केली जाईल. मे. स्वस्तिक कन्स्ट्रक्शन यांना हे काम देण्यात येईल.
मिठी नदीवरील अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील वाहतूक पूल आणि अंधेरी पश्चिम लोखंडवाला कॉम्प्लेक्स व लक्ष्मी इस्टेट यांना जोडणाऱया पुलाची मोठी दुरुस्ती केली जाणार आहे. तर मालाड अथर्व कॉलेजजवळील नाला मालाड चारकोप रस्त्यावरील पूल, लालजीपाडा वलनई पोईसर नदी व लिंक रोड पोईसर नदीवरील पूल, लालजीपाडा वलनई पोईसर नदी व लिंक रोड पोईसर नदीवरील पूल, मालाड पूर्व कुरार व्हिलेज अनुराधा जनरल स्टोअर येथील पादचारी पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे.
हे पूल नव्याने बांधणार
के/पश्चिम भागातील कासम नगर येथे पादचारी पूल, पी/उत्तर विभाग कुरार व्हिलेज गांधीनगर येथे वाहतूक पूल पुनर्बांधणी तर पुष्पा पार्क येथे पादचारी पूल नव्याने बांधण्यात येणार आहे.
पी/उत्तर विभागातील भूखंड क्र. 13 आणि 4, मालवणी मालाड प. येथे पादचारी पूल, याच परिसरातील मदर तेरेसा शाळेजवळ पादचारी पूल आणि प्लॉट क्र. 25 आणि 8 बी या विद्यमान वाहन पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
शिवाय गोरेगाव पूर्व येथे उत्तरेकडील रेल्वे पादचारी पुलाचे महानगरपालिका हद्दीमध्ये विस्तारीकरण करण्यात येणार आहे. तर पी/दक्षिण गोरेगाव पूर्व विभाग संतोष नगर येथे पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
































































