सफाई कामगारांच्या मागण्या मान्य, कंत्राटी कामगारांना कायम करणार; संप मागे, सोमवारी करार

पालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना कायम करण्यात येणार असून कामगारांचे एकही पद कमी केले जाणार नाही, असे ठोस आश्वासन पालिका प्रशासनाने आज कृती समितीला दिले. त्यामुळे सफाई कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला असून, सोमवारी मागण्यांबाबत करार करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली.

प्रलंबित मागण्यांसाठी 17 जुलै रोजी आझाद मैदानावर सफाई कामगारांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत कामगार संघटनांची बैठक झाली. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, कामगार नेते कपिल पाटील, सुरेश ठाकूर, विजय कुलकर्णी, अशोक जाधव, प्रकाश जाधव, रमाकांत बने, वामन कविस्कर, मिलिंद रानडे, रंगा सातवसे, बाबा कदम, देवी गुजर, शेषराव राठोड आणि प्रफुल्लता दळवी आदी उपस्थित होते.

विजयी मेळावा होणार

गेल्या दशकातला सफाई कामगारांचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कामगार संघटनांच्या नेत्यांकडून देण्यात आली. या मोठय़ा यशामुळे सोमवारी कामगारांचा भव्य विजय मेळावा होणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.