
मुंबई महापालिकेची अनधिकृत आणि अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतींविरोधात कठोर कारवाई सुरू केली असून आज के-पश्चिम विभागातील वेसावे गावठाण भागातील एक चार मजली इमारत तोडण्यात आली. वेसावे भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (कोस्टल रेग्यूलेशन झोन) अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. रामसे मार्गावर ‘राजे हाऊस’ नावाची सुमारे 3 हजार चौरस फुटांची 4 मजली इमारत अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. याबाबत संबंधितांना वेळोवेळी नोटीस बजावून बांधकाम तोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून काही कारवाई करण्यात न आल्याने तसेच दलदलीच्या क्षेत्रातील या अनधिकृत बांधकामांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने पालिका उपायुक्त (परिमंडळ-4) भाग्यश्री कापसे आणि के-पश्चिमचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.