धारावीत मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र, 5 हजार जणांना फायदा

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत आता मुंबईतील सर्वात मोठे ‘सुविधा केंद्र’ उभारण्यात येत आहे. या ठिकाणी 111 शौचकुपांसह 8 स्नानगृह आणि यांत्रिक पद्धतीने कपडे धुण्यासाठी 10 मोठय़ा मशीन्स उपलब्ध असतील. परिसरातील 5 हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पुढील सहा महिन्यात सुरू होणाऱ्या या भव्य सुविधा केंद्राचे भूमिपूजन आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले.

पालिका क्षेत्रातील आक्हानात्मक परिसरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेच्या अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पालिका अनेक उपक्रम राबवत आहे. यानुसार 2016 मध्ये घाटकोपरमधील आ़जाद नगर परिसरात पहिले सुविधा केंद्र उभारण्यात आले होते. आता पालिका क्षेत्रातील सहावे सुविधा केंद्र धारावी परिसरात उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे सुविधा केंद्र मुंबईतील सर्कात मोठे सुविधा केंद्र ठरणार आहे.

सुविधा केंद्राचा परिसरातील सुमारे 5 हजार व्यक्तींना लाभ होईल, अशी माहिती ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. या सुविधा केंद्रातील स्नानगृहाचा लाभ घेणाऱ्यांना साबणाची वडीही दिली जाणार असून आंघोळ करताना गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सुविधा केंद्राच्या कर वैशिष्टय़पूर्ण सोलर पॅनल बसविले जाणार आहेत. अधिकाधिक पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबतच या सुविधा केंद्रातील वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया केंद्रदेखील कार्यान्वित केले जाणार आहे.

अशी आहेत वैशिष्टय़े

सुमारे 2 हजार 600 चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या व तीन मजली असणाऱ्या या भव्य सुविधा केंद्रामध्ये स्त्री, पुरुष, दिव्यांग, लहान मुले यांच्यासाठी स्वतंत्र व वैशिष्टय़पूर्ण सुविधा असणार आहेत. तसेच हे सुविधा केंद्रात दुर्गंधी येणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

या सुविधा केंद्राची उभारणी ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ कंपनीच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’मधून (सीएसआर फंड) करण्यात येणार असून यासाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच ‘युनायटेड के मुंबई’ या संस्थेचेही सहकार्य या सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी मिळाले आहे.

या सुविधा केंद्राचा लाभ घेणाऱ्यांना प्रति लिटर पाण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क आकारले जाणार असून परिसरातील नागरिकांना केवळ 150 रुपयात कौटुंबिक मासिक पास दिला जाणार आहे. लहान मुलांना मोफत प्रवेश असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या