महापालिका निवडणुका एकत्रित लढणार! शिवसेना-राष्ट्रवादीसोबत काँग्रेसला घेण्याचे प्रयत्न सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी महापालिका निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवेल. यात काँग्रेसलाही एकत्र घेण्यासाठी चर्चा होईल. त्यासाठी प्रयत्न केले जातील, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

पुण्यात शनिवारी शिवसेना पदाधिकाऱयांच्या बैठकीत खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, महापालिका निवडणुका एकत्रित लढाव्यात यासाठीचे सूत्र ठरले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढवतील. काँग्रेसला एकत्र घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल, असे हे सूत्र आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर येथे शिवसेनेची ताकद जास्त आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच शिवसेनेपेक्षा जास्त आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल. निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा सत्तास्थापनेसाठी होईल.

देशात छुपी आणि चोरपावलांनी आणीबाणी

इंदिरा गांधींनी जाहीरपणे देशात आणीबाणी लावली होती. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने आणीबाणी लावण्यात आली होती, परंतु आता छुप्या पद्धतीने, मागच्या दाराने आणि चोरपावलांनी आणीबाणी लावली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली तेव्हा सामाजिक क्षेत्रातून, चित्रपटसृष्टीतून विरोध झाला होता याकडे लक्ष वेधले असता संजय राऊत म्हणाले, त्या काळातले सेलिब्रेटी कमिटेड होते, स्वातंत्र्यलढा, सामाजिक चळवळीशी त्यांचा संबंध होता. त्यांना राष्ट्रीय भान होते.

डॉ. कलाम यांना राष्ट्रपती, करणे हा वाजपेयी यांचाच ‘मास्टरस्ट्रोक’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते, असा अजब दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याचा खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्यामागे अटलबिहारी वाजपेयी यांचाच मास्टरस्ट्रोक होता. त्यात प्रमोद महाजनही होते. माझ्या माहितीनुसार त्यावेळी नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात नव्हते, परंतु काही लोक प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात. त्यात त्यांचेच हसू होते आणि त्यांचा विनोद होतो, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फटकारले.