
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (15 जानेवारी) सकाळपासून मतदान सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रेटीही हैराण झाले आहेत. मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील हा मनस्ताप सहन करावा लागला. मतदार यादीतील गोंधळामुळे निवेदिता सराफ यांना एक तास या केंद्रावरून त्या केंद्रावर चकरा माराव्या लागल्या. याबाबत निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या निवेदिता सराफ?
मी विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. मात्र तेथे माझे नावच मतदार यादीत नव्हते. त्यांनी मला 25 नंबरला जाण्यास सांगितले. तेथे गेले तोवर निवडणूक कर्मचारी गेली होती. प्रत्येक सोसायटीचे गट पाडले असून त्या गटातील मतदार या मतदान केंद्रात येऊन मतदान करतील असे ठरवले आहे. मात्र आमच्या बिल्डिंगची नावे का नाहीत? नाव आहे तर सिरीज नंबरच नाही. मोबाईल आतमध्ये नेऊ देत नाही, नाहीतर फोटो काढला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया निवेदिता सराफ यांनी दिली.



























































