प्रारुप मतदारयादी प्रसिद्धीसाठी पाच दिवसांची मुदतवाढ, आदित्य ठाकरेंनी उपस्थित केली शंका

आगामी महापालिका निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादीचा प्रसिद्धी दिनांक आता 10 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबर असा करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक विभागाकडून अधिकृतरीत्या मुदतवाढ दिल्याचे समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत निवडणूक प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, “ही गडबड स्पष्ट आहे. आम्ही त्यांना या प्रक्रियेत हस्तक्षेप करताना पकडलं आहे. ही चूक मुद्दाम झाली की चुकून, हे 15 तारखेला अंतिम यादी बाहेर आल्यावर स्पष्ट होईल.”

आदित्य ठाकरे यांनी आधीपासूनच मतदार यादीतील बदल, नाव वगळणे आणि प्रक्रिया विलंबित केल्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा आरोप आहे की निवडणुकीत काही गटांना राजकीय फायदा मिळावा म्हणून मतदार यादीत फेरबदल केले जात आहेत. निवडणूक आयोगाने मुदतवाढ का दिली, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप मिळाले नाही.