
मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्यासाठी पालिकेने 9 जुलैपासून आतापर्यंत तब्बल 10 हजार 797 खड्डे बुजवले आहेत. यामध्ये पालिकेच्या वरळी येथील अस्फाल्ट प्लाण्टमध्ये बनवण्यात आलेले कोल्डमिक्स भरपावसातही वापरता येत असल्याने वरदान ठरत असल्याचे पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले.
मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2055 किमीचे रस्ते आहेत. यामध्ये 1 हजार 030 किमी डांबरी तर 1050 किमी रस्ते काँक्रीटचे आहेत. यामधील डांबरी रस्त्यांवर डांबरातील ‘बिटुमन’च्या गुणधर्मामुळे पावसाचे पाणी संपर्कात आल्यानंतर खड्डे पडतात असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून एप्रिलपासूनच खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये 9 जुलैपर्यंत 7211 खड्डे बुजवण्यात आले होते. तर 10 जुलैपासून 26 जुलैपर्यंत दहा हजारांवर खड्डे बुजवण्यात आले आहेत. यामध्ये कोल्डमिक्सचा वापर करून बुजवण्यात आलेल्या खड्डय़ांची संख्या 15588 इतकी आहे. कंत्राटदारांच्या एजन्सीमार्फत 1154 खड्डे बुजवण्यात आले.



























































