
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठमोठे फायर इंजिन-बंब पोहचू शकत नसणाऱया दाटीवाटीच्या वस्ती, चाळी-गल्लीबोळात वेगाने जाऊन आग विझविणाऱया हायटेक फायर बाइक्स पालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच दाखल होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 24 फायर बाईक्स आणल्या जाणार आहेत. पालिकेचे उपमुख्य अग्निशमन दल अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी ही माहिती दिली.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱया मुंबईत वेगाने होणाऱया औद्योगिक आणि नागरी विकासाबरोबरच दाटीवाटीची वस्तीही वाढत आहे. दाटीवाटीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी बचाव कार्य पोहोचेपर्यंत बराच वेळ गेल्याने आगीसारख्या घटनेची तीव्रता वाढल्याने जीवित-वित्तहानी वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर दाटीवाटीच्या ठिकाणी आवश्यक साधनसामग्रीसह पोहोचून बचाव कार्य करणाऱया फायर बाईक्स मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आणल्या जाणार असल्याचे उपमुख्य अग्मिशमन दल अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.
अशा असणार फायर बाइक्स
या बाईक्सवर दोन्ही बाजूला पाण्याच्या छोटय़ा टाक्या असतील.
याशिवाय इनबिल्ट इंजिनमुळे घटनास्थळी असणाऱया पाण्याच्या टाक्यांमधून पाणी खेचून फवारा करता येणार आहे.
गाडीवरच पाण्याची सोय असल्यामुळे अडगळीच्या ठिकाणी पाठीवरून पंप नेण्याची गरज भासणार नाही.
आणखी दोन रोबोट दाखल होणार
भीषण आग पिंवा प्रचंड धुराच्या ठिकाणी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवणारा, आगीच्या ठिकाणी जाऊन आतील परिस्थिती बाहेरील कॉम्प्युटरवर दाखवणारा एक रोबोट सध्या पालिकेच्या अग्निशमन दलात आहे.
गेल्या काही मोठय़ा आगींमध्ये रोबोटचा यशस्वी वापर झाला आहे. त्यामुळे अग्मिशमन दल आणखी सक्षम करण्यासाठी आणखी दोन रोबोट आणले जाणार असल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. एका रोबोटसाठी पालिका सवा कोटी रुपये खर्च करणार आहे.



























































