
कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेसोबत दिवसरात्र झटणाऱया पालिकेच्या अग्निशमन दलाने आता ‘कोरोनामुक्ती’कडे वाटचाल सुरू केली आहे. अग्निशमन दलातील 122 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 83 जण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे यातील 20 जण आपल्या कर्तव्यावर हजरही झाले आहेत.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाने संपूर्ण मुंबईत निर्जंतुकीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवली. अग्निशमन दलाचे 2800 कर्मचारी ‘कोविड योद्धा’ अव्याहतपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे या काळात मुंबईत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे, आपत्कालीन स्थिती सांभाळणे अशी कामेही सुरू असल्याचे अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितले. मात्र आपले कर्तव्य बजावत असताना अनेक वेळा अग्निशमन दलाचे जवान-अधिकारीही नकळत कोरोनाबाधितांच्या निकटच्या संपर्कात येत असल्याने त्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांसाठी खास ‘कोरोना केअर सेंटर – 2’ ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन सुविधेसह आवश्यक त्या सर्क प्रकारच्या वैद्यकीय सुविधा तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून 24 तास उपलब्ध असल्याची माहिती उपप्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी दिली.
अशी आहे सद्यस्थिती
‘कोविड योद्धा’ म्हणून काम करीत असताना एकूण 122 जणांना कोरोनाची लागण झाली. यातील 83 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील 4 अधिकारी आणि 16 कर्मचारी पुन्हा डय़ुटीवर हजर झाले आहेत. तर 14 जण रुग्णालयात असून 17 जण क्वारेंटाइन केंद्रामध्ये आहेत. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, अग्निशमन दलातील आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जवानांचा आत्मविश्वास महत्त्वपूर्ण ठरतोय!
आपत्कालीन परिस्थितीचा नेहमीच सामना करणाऱया जवान-अधिकाऱयांमध्ये प्रशिक्षण, शिस्तीमुळे नेहमीच आत्मविश्वास असतो. यातच बाधित कर्मचाऱयांशी डॉक्टरांसह वरिष्ठ अधिकारी संपर्क साधून धीर देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवत असल्यामुळे आपले कर्मचारी कोरोनावर विजय मिळवत असल्याचे अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.


























































