
पालिकेचे चार उपायुक्त आणि सहा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर चार विभागांतील कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्याच विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. या बदल्या रूटीन बदल्या असल्याचे प्रालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये उपायुक्त विजय बालमवार परिमंडळ – 2 यांची (महालक्ष्मी ते माहीम, करीरोड ते शीव) व प्रकल्प संचालक मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था येथून परिमंडळ -1 (कुलाबा ते भायखळा आणि नरीमन पॉइंट ते मुंबई सेंट्रल) येथे बदली करण्यात आली आहे. तर हर्षद काळे यांची परिमंडळ – 1 येथून परिमंडळ – 2 व प्रकल्प संचालक मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था येथे बदली करण्यात आली आहे. विश्वास शंकरवार यांची परिमंडळ – 7 (कांदिवली, बोरिवली, दहिसर) येथून परिमंडळ – 5 (घाटकोपर ते मुलुंड)मध्ये बदली करण्यात आली आहे. तर डॉ. भाग्यश्री कापसे यांची परिमंडळ – 5 येथून परिमंडळ – 7 येथे बदली करण्यात आली आहे. तर सहाय्यक आयुक्त असलेले किशोर गांधी यांची मुलुंडच्या टी वॉर्ड येथून पूर्व उपनगराच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सहाय्यक आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर पश्चिम उपनगरातील अतिक्रमण निर्मूलनाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. संध्या नांदेडकर यांची दहिसर आर उत्तर येथून कांदिवली येथील आर दक्षिण विभागात, मृदुला अंडे यांची बाजार विभागातून दहिसर येथील आर उत्तर विभागात, विश्वास मोटे यांची अंधेरी पश्चिम येथील के पश्चिम विभागातून येथून करनिर्धारक व संकलक विभागात, पृथ्वीराज चौहाण यांची चेंबूर एम पश्चिम विभागातून अंधेरी पश्चिम येथील के पश्चिम विभागात, मनीष वळंजू यांची कुर्ला येथील एल विभागातून भायखळा येथील ई विभागात सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंत्यांवर सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी
बाजार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश रसाळ, मुलुंडच्या टी विभागाचे कार्यकारी अभियंता राजन प्रभू, चेंबूरच्या एम पश्चिम येथील सुरेश सागर आणि कुर्ला येथील कार्यकारी अभियंता हरिनारायण साहू यांना त्यांच्याच विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
























































