मुंबई महापालिकेचा आधार; साडेपाच लाख विद्यार्थ्यांना तांदूळ, मसूर डाळ आणि हरभरे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या 2034 शाळांमधील साडेपाच लाख विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून तांदूळ, मसूर डाळ आणि हरभरे  देण्यात येत आहेत. कोरोना काळात राज्य सरकारकडून आणि पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱया या योजनेमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे. यामध्ये पहिले ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 10 किलो 700 ग्रॅम तांदूळ, हरभरा, डाळ तर सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 16 किलो 50 ग्रॅम तांदूळ, हरभरा आणि डाळ दिली जात आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेच्या शाळा बंद आहेत. शाळा सुरू असताना तब्बल 27 शालेय वस्तू मोफत देणाऱया पालिकेने शाळा बंद असतानाही आपल्या विद्यार्थ्यांना आधार दिला आहे. राज्य सरकारच्या सहाय्याने आणि पालिकेच्या माध्यमातून सुरू असणाऱया या उपक्रमाबद्दल आज झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेना नगरसेविका शुभदा गुढेकर यांनी या  उपक्रमाबद्दल राज्य सरकार आणि पालिकेचेही अभिनंदन केले. चारकोप सेक्टर – 1 मधील पालिका शाळेत शेकडो विद्यार्थ्यांना या धान्याचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. पालिका शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना महागडे मास्क घेणे शक्य नसते. त्यामुळे पालिकेने विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे दोन मास्क प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावेत अशी सूचनाही त्यांनी केली.

 शाळा सुरू होईपर्यंत योजना सुरूच राहणार

गेल्या वर्षी मार्चपासून शाळा बंद झाल्यानंतर राज्य शासन आणि पालिकेच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत या किराणा वस्तूंचे वाटप करण्यात येत विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य देण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले.

पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन 100 ग्रॅम आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन 150 ग्रॅम या प्रमाणे या वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. शाळा सुरू होईपर्यंत ही योजना सुरूच राहणार असल्याची माहिती पालिका शालेय पोषण आहार विभाग उप शिक्षणाधिकारी अजय वाणी यांनी दिली.